पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या जटायु अक्षरसेवा प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कोथरूडच्या स्वस्तिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ, रा. स्व. संघाचे रवींद्र वंजारवाडकर, ग्रंथाचे संपादक संतोष जाधव, गोसेवा प्रमुख रवींद्र रबडे, पत्रकार सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते. देशविदेशातील 27 विद्वानांच्या चिंतनशील लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. अमेरिकेतील विद्वान डेव्हिड फ्रॉली, केंद्रीय गृहमंत्रालयात अवर सचिव राहिलेले आरव्हीएस मणी, ज्येष्ठ पत्रकार अभिलाष खांडेकर, यमाजी मालकर, रमेश पतंगे, विवेक घळसासी, तुषार दामगुडे, मिलिंद कांबळे, वेणु धिंगरा, प्रमोद डोरले, अरुण करमरकर, अभिराम दीक्षित, विजय तिवारी आदी लेखकांचा यात समावेश आहे. 9767284038 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या अन् ग्रंथ मागवा अशी वाचक केंद्र पद्धत वापरल्याचे जाधव यांनी सांगितले. या ग्रंथातील एक लेखक असलेले श्री. तोरसेकर म्हणाले, नरेंद्र ते नरेंद्र अशी सव्वाशे वर्षांची भारताची वाटचाल या ग्रंथात आहे. ब्रह्मर्षी हा विचार असतो. तो कृतीत आणतो तो राजर्षी असतो. स्वामींनी मिळालेल्या मोजक्या मिनीटात आपल्या मोजक्या शब्दांनी जग जिंकले होते आणि मोदींनी मिळालेल्या मोजक्या संधींचा नेमका उपयोग करून आज जग आपल्या मताशी जुळवून घेऊन इथपर्यंत वेळ आणली आहे. एक स्वभावाने व जगण्याने संन्यासी होता आणि दुसरा राजसत्तेवर आरुढ झालेला असला तरी मनाने व स्वभावाने संन्याशीच राहिलेला आहे. कुटुंब नातेगोते वा संसारी जीवनावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेला हा संन्याशी ब्रह्मर्षी नाही, तर राजर्षी आहे, असे ते म्हणाले.संपादक संतोष जाधव म्हणाले, आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणे ठळक होताना दिसत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आपले जीवन घडवले, त्याग आणि सेवा हे भारतवर्षाचे शाश्वत आदर्श ज्यांनी आपली जीवननिष्ठा बनवली, अशी समर्पित व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्या भारताची पायाभरणी सुरू आहे. अशा वेळी जगद्गुरू भारत (स्वामी विवेकानंद) आणि नवा भारत (नरेंद्र मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, राष्ट्रीयतेचे विविध आयाम समोर यावेत, या दृष्टीने या ग्रंथाची निर्मिती केली आहे. पुस्तकाचे नाव : ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदीपृष्ठे : 276, मूल्य : 400/-पुस्तक मागवण्यासाठी पुढील लिंकवर जा…http://jataau.com/shop