Politics

Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आधी काही वर्षे संजीवन समाधी घेतली होती शिवयोगी सिद्धरामांनी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष, शिवयोगी सिद्धराम. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या र्शमदानातून तलाव खोदले, गरीब व निरार्शितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम समाजसुधारक, योगी तसेच एक संवेदनशील भावकवीही होते. अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले. कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की, केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणली होती, म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून 68 हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील 1300 वचनेच उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते व तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते. दरवर्षी मकरसंक्रांतीला सोलापुरात शिवयोगी सिद्धरामांची यात्रा भरते. गड्डा यात्रा नावाने ही यात्रा प्रसिद्ध आहे. नंदीध्वजांची नयनरम्य मिरवणूक निघते.

वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे, असे स्वामी विवेकानंद का म्हणाले, जाणून घेऊया…

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच विवेकानंद पुण्यतिथीच्या निमित्ताने शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही… जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला. शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं. हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता. अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल. दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

Scan the code