मूलनिवासी थोतांड मांडणाऱ्या तथाकथित पंडितांना स्वामी विवेकांनंदांनी कोणत्या शब्दांत सुनावले वाचा

जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.

युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !

कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच !

रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? – लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? – ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? – हा खुळेपणा आता पुरे !

Scan the code