Life

Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल स्वातंत्र्यसंग्रामातील प्रसिद्ध नेत्यांची काय भावना होती, पाहूया…

लोकमान्य टिळक : दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी : सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले. बिपिनचंद्र पाल : बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली. गोपाळकृष्ण गोखले : गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत. (संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई) वि. दा. सावरकर : क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती. महात्मा गांधी : आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस : सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. रवींद्रनाथ टागोर : रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला. जवाहरलाल नेहरू : चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते… आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते. इंदिरा गांधी : इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले. सर्वपल्ली राधाकृष्णन : डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले. डॉ. एपीजे कलाम : डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे. नरेंद्र मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

मूलनिवासी थोतांड मांडणाऱ्या तथाकथित पंडितांना स्वामी विवेकांनंदांनी कोणत्या शब्दांत सुनावले वाचा

जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा. युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे ! कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच ! रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? – लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? – ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? – हा खुळेपणा आता पुरे !

वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत

इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की स्वार्थ बोकाळतो. स्वार्थ बोकाळला की देशभक्ती मागे पडते. देशभक्ती गौण मानणाऱ्यांच्या हाती नेतृत्व आले की देशाचा सत्यानास होतो. याचा दाहक अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे. वंदे मातरमच्या स्फूर्तीदायी इतिहासाकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षच झाले. त्या इतिहासाची उजळणी व्हावी यासाठी ही मुलाखत येथे सादर करत आहोत. २००७ साली सोलापुरातील वृत्तदर्शन या स्थानिक टीव्ही वाहिनीवर वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत घेतली होती. वन्दे मातरम् part 1 वन्दे मातरम् part 2 वन्दे मातरम् part 3 वन्दे मातरम् part 4

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आधी काही वर्षे संजीवन समाधी घेतली होती शिवयोगी सिद्धरामांनी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष, शिवयोगी सिद्धराम. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या र्शमदानातून तलाव खोदले, गरीब व निरार्शितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम समाजसुधारक, योगी तसेच एक संवेदनशील भावकवीही होते. अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले. कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की, केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणली होती, म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून 68 हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील 1300 वचनेच उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते व तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते. दरवर्षी मकरसंक्रांतीला सोलापुरात शिवयोगी सिद्धरामांची यात्रा भरते. गड्डा यात्रा नावाने ही यात्रा प्रसिद्ध आहे. नंदीध्वजांची नयनरम्य मिरवणूक निघते.

वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे, असे स्वामी विवेकानंद का म्हणाले, जाणून घेऊया…

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच विवेकानंद पुण्यतिथीच्या निमित्ताने शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही… जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला. शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं. हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता. अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल. दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र

वंदे मातरम्या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा धर्मांच्या आधारे केलेली या देशाची-बंगालची फाळणी रद्द झाली. वंदे मातरम्ला अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या भारतवर्षाचे तुकडे पडले. आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांग्लादेश उगवले. या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् या महामंत्रात आहे… मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणार्‍या बंकिमचंद्रांचे जीवनकार्य ॠषीतुल्य आहे. आजच्या पिढीला प्रेरक आहे. वंदे मातरम्चे उद्गाते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या स्मृतीला 125 वर्षे झाल्यानिमित्त त्यांची जीवनगाथा प्रसिध्द होत आहे.. ॠषी बंकिम मराठीतील पहिले चरित्र लेखक: मिलिंद सबनीस Pages 225, Price Rs. 250/- भारतीयत्व जागवणारे महान नायक बंकिमचंद्र यांचे प्रेरक चरित्र बाल आणि तरुणांत मोठ्या प्रमाणात पसरावं असं तुम्हालाही वाटतं? ग्रंथालय निधी योजनेत आपले स्वागत आहे… आपल्या योगदानातून महाराष्ट्रातील सुमारे 12,858 वाचनालये, 40 हजार ग्रामपंचायतींपर्यंत ॠषी बंकिम पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माध्यमिक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं आणि अन्य शैक्षणिक संस्थांतील तरुणाईपर्यंत हे चरित्र पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेत सढळ हाताने योगदान देण्यासाठी विनम्र आवाहन करीत आहोत!

Scan the code