वैकुंठी योजिले तुका-शिवा
श्री संत तुकोबाराय व शिवराय यांच्या जन्मासाठीचे वैकुंठातील आलोच
खरे तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे जन्मापूर्वीचे चरित्र रेखाटणे हा एक अलौकिकत्वाचा मागोवा घेण्याचा असंभव प्रयत्न आहे. एखाद्या बालकाने सारे आकाशच मुठीत धरून ठेवण्याचा बालहट्ट करावा तसाच हा प्रकार आहे. साराच्या सारा गंगौघ माझ्या चोचीत धरायचा आहे, म्हणून चिमणीने चोच उघडावी तसाच हा खटाटोप आहे. आतापर्यंत कोणत्याही महापुरुषांनी असा प्रयत्न केलेला नाही. मग मी तर अतिसामान्य! अशा माणसाने अशी उठाठेव का करावी? कोणत्याही विद्वान सत्पुरुषांनी अशा कल्पना केलेल्या नसताना किंवा त्यावर कुणी लिहिण्याचाही विचार केला नसताना हा वाङ्मय प्रपंच मी का करीत आहे त्याचे कारण माऊली म्हणतात त्याप्रमाणे –
परी एथ असे एकु आधारु । तेणेचि बोले मी सधरु ।
जै सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ – ज्ञाने. अ./175
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वै. गुरुवर्य श्री शंकर महाराज कंधारकर व श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वै. गुरुवर्य रामकृष्णभाऊ येडशीकर यांच्या कृपाशीर्वादाचे पाठीशी मोठे पाठबळ आहे. श्री तुकारामचरित्र ज्ञानयज्ञकथा निरूपण करीत असता श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे श्री शाहू महाराज व श्रोत्यांनी हे चरित्र लिहिण्याविषयी केलेला आग्रह हेच चरित्र (जन्मापूर्वीचे) लिहिण्यास प्रवृत्त होण्याचे कारण आहे.
खरे तर तुकोबांच्या जन्मापूर्वी वैकुंठामध्ये झालेल्या सभेचा वृत्तांत लिहिणे म्हणजे केवळ कल्पनाविलास आहे, असे वाटत असले तरी त्या कल्पना, शास्त्र अविरोधी आहेत. आपल्या पूजनीय संत महात्म्यांच्या दिव्यत्वाची उंची, पवित्रकार्य हे दृष्टी जाईल तिथपर्यंत पाहण्याचा प्रयास केला आहे. अर्थात माझ्या गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाचे बळ बुद्धीच्या पाठीशी आहे.
तरी पण जसा किती जरी वेगाने सोडलेला एखाद्या शूराचा बाण हा सुद्धा शेवटी कुठे तरी पृथ्वीवरच पडणार किंवा आता विज्ञानाने अथक व थक्क करून सोडलेला एखादा उपग्रह एखाद्या ग्रहापर्यंतच जाणार! तो काय सूर्याला जाऊन भिडेल काय? किंवा ब्रह्मांडाच्या सीमा ओलांडेल काय? त्याला आकाशाच्या पैलतीराला जाता येईल काय? हे जसे अगदी अशक्य आहे, त्याप्रमाणे श्री तुकोबांच्या चरित्राचा कितीही अभ्यास केला तरी त्यामुळे तुकोबांच्या चरणापर्यंत जाता येणे अशक्यच आहे.
Reviews
There are no reviews yet.