Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत – डॉ. एस. एल. भैरप्पा. आजवर त्यांनी 21 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात. “पर्व’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.

हलकी-फुलकी, टाईमपास करणारी पुस्तके कुणी फुकट जरी दिली तरी ती वाचायला आपल्या जीवनात वेळ आहे कुठे? गंभीर विषयाची पुस्तके वाचली पाहिजेत, अशी त्यांची धारणा आहे. स्वाभाविकच त्यांची पुस्तके गंभीर विषय हाताळणारी आहेत. गंभीर विषयावरील कादंबऱ्या असूनही सर्वाधिक खपाच्या ठरतात याचे रहस्य त्यांच्या प्रभावी शैलीत आणि पारदर्शी भूमिकेत आहे असे वाटते. त्यांची कादंबरी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असली तरी साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित आणि मान्यवर लेखकांनी या कादंबरीविरोधात रान उठविले आहे.

फेब्रुवारी 2007 मध्ये “आवरण’ प्रकाशित झाली. 2009 पर्यंतच हिची 22 पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तके ही “आवरण’वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत. वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.

गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.

सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. “हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात “दा-विंची कोड’ या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.

कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅक पद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992 साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्‌ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.

रझिया ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.

रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन्‌ आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे – आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.

याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.

स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.

लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्‌ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी “आवरण’च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.

आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. 136 ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.

भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू.आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशारीतीने करतात, हे “आवरण’मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी “आवरण’वर तुटून पडताना दिसत आहे. “आवरण’मधील भूमिका ही 136 ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.

मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उद्धरणे पाहा…

“”विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला “आवरण’ म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला “विक्षेप’ असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला “अविद्या’ आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला “माया’ म्हटलं जातं.”

“”… आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?”

“” औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्‌ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.”

“”… मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून “आपण त्यांचेच वारसदार’ या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.”

पुस्तकाचे नाव : आवरण

लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

अनुवाद : उमा कुलकर्णी

मूल्य : 250/- पृष्ठे : 269

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

Scan the code