डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे शक्तीशाली विचार सर्वसामान्यांपर्यंत कधी आलेच नाहीत

ज्या भूमीने व्यास, कपिल, कणाद, गौतम, चार्वाक, महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्त्ववेत्ते निर्माण केले आणि बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे.

ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्‌ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.

आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही “एक राष्ट्र’ म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण “अखंड हिंदस्थान’च आपल्या हिताचा वाटू लागेल.

माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.

जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.

देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.

कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.

शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.

हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.

पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.

माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो.

प्रस्तुतच्या लेखकाने समाजकार्याप्रीत्यर्थ जेवढा स्वार्थत्याग करणे त्यास शक्य होते, तेवढा स्वार्थत्याग त्याने केला। तो काही संस्थानिक नाही की जहागीरदारही नाही. काही झाले तरी द्रव्यानुकूलता नसता इंग्रज सरकारने देऊ केलेली दरमहा अडीच हजार रुपयापर्यंत वाढू शकणारी नोकरी त्याने नको म्हणून सांगितली. वकिलीसारख्या स्पृश्य लोकांवर अवलंबून असणाऱ्या धंद्यात विशेष किफायत मिळण्याची आशा नसताही केवळ समाजकार्य करण्यास मोकळीक असावी म्हणून त्याने तो मार्ग पत्करला आहे. रूढ धर्माचारातील आणि लोकाचारातील दोषांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर कार्य हाती घेतले असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा भडिमार तो एकसारखा सोशित आहे. कवडीचा फायदा नसताना त्याने एक वर्षाच्या आत “बहिष्कृत भारता’चे बऱ्यावाईट रीतीने रकाने भरून काढून लोकजागृतीचे काम केेले व ते करताना त्याने आपल्या प्रकृतीकडे, सुखाकडे, चैनीकडे व ऐषारामाकडे न पाहता डोळ्यांच्या वाती केल्या.

मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.

अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे। पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो- “काही घाबरू नकोस, जीवन आशावादी होईल.

ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.

तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको.

राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.

सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.

मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.

हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.

मला बोैद्धधर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्‌भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.

Scan the code