राष्ट्रवाद : ३६० अंशातून या ग्रंथाची निर्मिती ३० हून अधिक विचारवंतांच्या योगदानातून

देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रवाद या विषयावर देशातील 30 हून अधिक विचारवंतांचा सहभाग घेऊन राष्ट्रवाद 360 अंशातून या विशेष ग्रंथाची निर्मिती जटायु अक्षरसेवा ने केली. महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ठसा उमटवणारी ही निर्मिती आहे.

सत्यासाठी प्राण पणास लावणारा, अन्यायाचा प्रतिकार करणारा जटायु आमच्या आदर्शस्थानी आहे. केवळ अन्याय रोखणे याच एकमेव उद्देशाने जटायु पुढे सरसावला. शक्तिशाली असलेल्या रावणाशी कडवी झुंज दिली. आपल्या पश्चात आपल्या आप्त – स्वकियांचे काय होईल, याचीही फिकीर केली नाही. सर्वोच्च त्यागाचे हे उदाहरण आहे. जटायुसाठी माणुसकीची भावना महत्त्वाची होती . मानवतेचे सर्वोच्च कल्याण व्हावे, याविषयी सर्वांचे एकमत असते. परंतु, ते कोणत्या मार्गाने व्हावे याविषयी मात्र टोकाची मत – मतांतरे आहेत. ही मतभिन्नता प्रसंगी इतक्या टोकाला जाते की, त्यातून संघर्ष उद्भवतो. अशा प्रकारचा संघर्ष हेच आज मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. संपूर्ण मानवतेलाच धोका उत्पन्न होईल की काय, अशी स्थिती यातून उद्भवली आहे. _ _ मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. सध्या जगभरात ही संकल्पना वादाची ठरताना दिसत आहे. भारतातही राष्ट्र या संकल्पनेबद्दल टोकाचे मतभेद आहेत. पाश्चात्य आणि भारतीय संकल्पनेत टोकाची भिन्नता आहे. यातून विविध विचारगट आमनेसामने उभे ठाकले आहेत. वास्तविक पहाता कोणत्याही देशाच्या दृष्टीने राष्ट्र ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असते. आपला प्रिय देश भारतही याला अपवाद नाही. आपल्या भारतवर्षाला किमान १० हजार वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण चराचर सृष्टीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या ऋषी – मुनींनी राष्ट्र ही संकल्पना विकसित केली. याचे शेकडो दाखले आपल्या प्राचीन ग्रंथांत आहेत. काळाच्या ओघात अनेक राष्ट्रे उदयास आली अन् लुप्तही झाली. भारतवर्ष त्याला अपवाद आहे. संपूर्ण मानवतेला मार्गदर्शक ठरेल अशी जीवनपद्धती येथे विकसित झाली. मानवतेचे कल्याण करणारे विचार जगाला द्यायचे असतील तर भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे आणि राष्ट्र या संकल्पनेबद्दल समाजात संभ्रमाची भावना असणे हिताचे नाही. म्हणूनच “राष्ट्रवाद : ३६० अंशातून ‘ या ग्रंथाची योजना केली. या ग्रंथामुळे वाचकाला आपली भूमिका ठरवणे सोपे जाईल, याचा आम्हाला विश्वास वाटतो.

पृष्ठे : २२४, मूल्य : ३००/-

प्रकाशक : जटायु अक्षरसेवा

Scan the code