Sale!

समर्पण – देशभक्त स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर

150.00

डॉ. अंत्रोळीकरांचे नाव उच्चारताच सोलापूरचा स्वातंत्र्यलढा – मार्शल लॉचा इतिहास डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरने साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते. भारत स्वतंत्र होण्याअगोदरच सोलापूर स्वतंत्र झाले होते. त्या स्वतंत्र सोलापूरचे नेते होते डॉ. अंत्रोळीकर. लोकमान्य टिळकांनंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील समाज संघटित करणार्‍या प्रमुख नेत्यांत डॉक्टर अंत्रोळीकर होते.
समाजातील सुशिक्षित व्यक्ती त्यागाने आणि सेवेने समाजाचे कसे प्रभावीपणे नेतृत्व करू शकत होती हे डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या स्फूर्तिदायक नेतृत्वाने शेकडो नागरिकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. गरीबांचे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर त्यांचा निषेध केल्याबद्दल
डॉ. अंत्रोळीकर यांना वयाच्या 78 व्या वर्षी 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला. यावरून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा सिद्ध होते.

थोर स्वातंत्र्यसेनानी व आयुष्यभर विधायक नेतृत्व करणारे त्यागशील व्यक्तिमत्त्वाचे डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर यांच्याबद्दल आदरभाव प्रकट करणारा स्मृतिग्रंथ डॉक्टरांचे चिरंजीव श्री. मोहन अंत्रोळीकर आणि निष्ठावंत पत्रकार श्री. पु. ज. बुवा यांनी डॉक्टरांच्या निधनानंतर दशकभरामध्ये परिश्रमपूर्वक सिध्द करून “समर्पण” या समुचित नावाने प्रसिध्द केला. त्या स्मृतिग्रंथाची ही सुधारित स्वरुपातील संग्राह्य दुसरी आवृत्ती श्री. मोहन अंत्रोळीकरांनी सिध्द केली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. अंत्रोळीकर यांच्याबद्दल लेख लिहिले आहेत वा मनोगते प्रकट केली आहेत. नमुन्यादाखल उल्लेख करावयाचा झाल्यास डॉक्टरांबद्दलचा हा आदरभाव प्रकट करण्यामध्ये राजकीय क्षेत्रातील श्री. मोरारजीभाई देसाई, श्री. नानासाहेब गोरे, श्री. भाई एस. एम. जोशी, श्री. शरद पवार, श्री. सुशीलकुमार शिंदे यांचा निर्देश करता येईल. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, अच्युतराव पटवर्धन यांच्यासारख्या विचारवंत व्यक्तींनी व डॉ. नी. त्र्यं. पुंडे, डॉ. श्रीकांत येळेगावकर यांसारख्या अभ्यासकांनी, तसेच सर्वश्री रंगा वैद्य, व्ही. आर. कुलकर्णी, ल. गो. काकडे, हरिभाऊ जोशी अशांसारख्या मान्यवर पत्रकारांनी डॉक्टरसाहेबांच्याबद्दलचा आपला आदरभाव प्रकट केला आहे. डॉक्टरसाहेबांच्या कुटुंबातील श्री. मोहन अंत्रोळीकर, सौ. सुजाता व सौ. जानकीबाई यांनी आपल्या लेखातून डॉक्टरसाहेबांच्या व्यक्तीमत्त्वातील मनोज्ञ पैलूंचे दर्शन आत्मीयतेने घडविले आहे. साकल्याने पाहता ‘समर्पण’ या स्मृतिग्रंथातील सर्वच लेखांतून डॉक्टरसाहेबांचे जीवनचरित्र उलगडते, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध स्फूर्तिपद पैलू वाचकांच्या मनावर ठसतात.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Scan the code